मणिपुरात निदर्शने सुरुच; दोन पोलिस जखमी   

इंफाळ : मणिपूरमधील मैतेई संघटना अरामबाई टेंगटोलचे नेते कानन सिंग आणि इतर चार जणांची बिनशर्त सुटका करावी, या मागणीसाठी दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहेत. इंफाळ खोर्‍यात अनेक जिल्ह्यांत सुरक्षा दलाबरोबर निदर्शकांची झटापट झाली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
सोमवारी रात्री इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुराई लामलोंग भागात चकमकी उडाल्या. त्यामुळे, सुरक्षा दलास जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. निदर्शकांनी एक चारचाकी जाळल्याचेही वृत्त आहे. थोबल आणि काकचिंग जिल्ह्यांत निदर्शकांकडून ठिकठिकाणी टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. दरम्यान, निदर्शकांच्या शोधासाठी पोलिसांसह निमलष्करी दलाने शोध मोहीम हाती घेतली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील नंबोलमध्ये निदर्शकांबरोबरील चकमकीत दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles